सासवड : सासवड येथील पोलीस लाईन समोरील डी.वाय.एस.पी ऑफिस समोर 27 लाख 80 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास लवथळेश्वर निवास येथे घडली आहे. याप्रकरणी अतुल अशोक जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल जगताप हे लवथळेश्वर निवास येथे राहत आहेत. त्यांचे तळ मजल्यावरील घर बंद होते. ते सकाळी उठल्यावर फिर्यादी यांची पत्नी खाली गेली असता, कुलूप तोडलेले त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी घरात पहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील दहा लाख रुपये किमतीचे १३ तोळ्यांचे दागिने आणि १७ लाख ८० हजार रुपयाची रोखड अशी एकूण २७ लाख ८० हजार रुपयाची जबरी चोरी झाल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती अतुल जगताप यांनी सासवड पोलीस स्टेशनला दिली. याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.