पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकींचे बिगूल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याच दिसत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. असं असताना पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठी देणार आहेत.
अजित पवार याचे खंदे समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही बोलले जात आहे.
कोण आहेत आनंद अलकुंटे
आनंद अलकुंटे हे माजी नगरसेवक असून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच अलकुंटे यांनी पीएमपीएलचे माजी संचालक म्हणून ही काम पाहिलं आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात आनंद अलकुंटे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
‘हे’ माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
हडपसरमधून अजित पवार समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. तर मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.