पुणे : माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी देखील नातेसंबंध जोडत असतो. घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. असाच कुटुंबाचा सदस्य असलेल्या एका पाळीव श्वानाला स्पोर्टस गनने फायर करुन विकलांग केल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळ मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथे घडली आहे.
ही घटना २१ नोव्हेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रिती विकास आग्रवाल (वय ४६, रा. मांजरी बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अली रियाज थावेर (रा. झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आग्रवाल हे मांजरी येथील झेड कॉर्नरजवळील लोकमंगल सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्यांनी घरात पाळीव कुत्री पाळली असून, मोठ्या प्रेमाने तिचे नाव बाउंसी असे ठेवले आहे. २१ नोव्हेंबर रोजी ही कुत्री सोसायटीसमोरील डांबरी रस्त्यावर बसलेली असताना आरोपी थावेर याने स्पोर्टस गनने फायर करुन तिला जखमी केले. अचानक फायर झाल्याने ती घाबरली असून, तिला कायमस्वरूपी विकलांगत्व आले आहे.
दरम्यान, पाळीव श्वानाला अपंगत्व आल्याने फिर्यादी आग्रवाल संतप्त झाल्या. पाळीव प्राण्यांना क्रुरतेने वागविल्याप्रकरणी त्यांनी आरोपीविरूद्ध पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत.