उरुळी कांचन, (पुणे) : मोबाईल फोन परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
उरुळी कांचन, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात सोमवारी (ता. ०६) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वैभव तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद फिरोज मोहम्मद शरीफ सलमानी (वय २५, रा. दत्तवाडी उरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैभव तरंगे याने फोन करण्यासाठी मोहम्मद फिरोज यांचा मोबाईल घेतलेला होता. तो मोबाईल फोन परत देत नव्हता. त्यामुळे मोहम्मद फिरोज यांनी तो मोबाईल हातातून ओढून घेतला. त्याचा राग आल्यामुळे वैभव याने फिरोजला मारहाण करायला सुरुवात केली.
त्यावेळी त्यांचा भाऊ मोहम्मद फरीद हा वाचवण्यासाठी आला. त्यावेळी आरोपीने फरीद याच्या डोक्यामध्ये त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने प्लायवूडची चौकोनी फळी मारली आणि गंभीर जखमी केले. त्यानंतर फिरोज यांना देखील बेदम मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी तरुणाला मारताना ‘आम्ही इथले भाई आहोत. कोणी आमच्या मध्ये यायचे नाही. कोणी आले तर त्याचा पण कार्यक्रम करू’ असे म्हणत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून आणखी दोघांचा तपास सुरु आहे. पुढल तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.