पुणे : संगणमत करुन आयडीएफसी बँकेकडून लोन मंजुर करुन, मंजुर झालेले कर्ज रद्द करण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल कोळी, उमेश मालुसरे, पापा मुलाणी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईश्वर भागवत दहीफळे (वय-३२, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) यांनी गुरुवारी (ता. २) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट २०२३ दरम्यान येरवडा येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करुन फिर्यादींना आयडीएफसी बँकेकडून ५ लाख ८७ हजार ५११ रुपयांचे लोन मंजुर करुन दिले. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे फिर्यादी यांना त्यावेळी कर्ज नको होते. बँकेशी संपर्क साधून, त्यांनी लोन अकाउंट बंद करण्यास सांगितले.
हीच संधी साधून, आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. लोन अकाउंट बंद करण्याच्या बहाण्याने कर्जाची रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या बँक खात्यावर जमा करुन घेतली. तसेच लोन बंद करण्यासाठी फिर्यादीकडून कागदपत्रे घेतली. व कागदपत्रांचा गैरवापर करुन आरोपींनी पे यु फायनान्स या खासगी वित्तसंस्थेकडून २ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज
घेतले.
या प्रकारामुळे ईश्वर दहिफळे यांची तब्बल ८ लाख ५४ हजार १९९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. फसवणूकीचा प्रकार समजताच ईश्वर दहीफळे यांनी तक्रार दाखल केली. तक्रार अर्जाची चौकशी करुन, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.