नारायणगाव: चारित्र्यावर संशय घेऊन नवविवाहितेला वारंवार शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. मंगेश दीपक डुकरे (रा. पारगाव, तालुका जुन्नर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या संदर्भात विवाहितेचा भाऊ चेतन रवींद्र आगळे (रा. भागडी, तालुका आंबेगाव) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगेश डुकरे आणि प्रियंका यांचा प्रेमविवाह २८ ऑगस्ट २०२४ रोजी झाला. लग्नानंतर मंगेश हा नेहमी दारू पिऊन घरी प्रियंका हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. मारहाणीची बाब तीने आईला २-३ महिन्यापूर्वी सांगितली होती. नवीन लग्न झाले आहे, सुधारेल तो असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.
वारंवार होणारी मारहाण आणि शारीरिक जाचाला कंटाळून २० एप्रिल २०२५ रोजी पारगाव येथील सुनील दत्तात्रेय चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीत प्रियंका हिने जीव दिला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी मंगेश डुकरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हे करीत आहेत.