दौंड, (पुणे) : दौंडमधील माजी नगरसेवकासह त्याच्या भावाने लोखंडी कोयता हातात घेऊन श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात धुडगूस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (ता. 26) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दौंडमधील गोपाळवाडी रोड येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक, त्याचा भाऊ व अनोळखी तिघांसह सहा जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक राजेंद्र बारवकर, संजय बारवकर, अमित बारवकर, नागनाथ भगत, (रा. सर्व दौंड जि. पुणे) व इतर अनोळखी तीन इसम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भुषण कुंडलिक देवकाते यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी आरोपी संजय बारवकर, राजेंद्र बारवकर,अमित बारवकर, नागनाथ भगत व इतर अनोळखी तीन इसम हे हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन गोपाळवाडी रोडवर असणाऱ्या स्वप्न सम्राट अपार्टमेंट येथील श्रीराम फायनान्स कार्यालयात आले होते.
त्यानंतर तेथे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करीत अमित बारवकर यांनी ऑफिसमधून कोण फोन करुन शिवीगाळ करीत आहे, असे विचारले. ब्रँच मॅनेजर देवकाते म्हणाले की, आमच्या ऑफिसमधील कोणताही कर्मचारी तुम्हाला शिवीगाळ करीत नाही. तुम्ही हेड ऑफिला चौकशी करा. या उत्तरावर चिडून जात संजय बारवकर हा हातातील कोयता घेवुन त्यांच्या अंगावर धावून आला. उद्या तुम्ही ऑफिस कसे उघडता तेच बघतो व ऑफिस उघडणाऱ्यांच्या डोक्यात कोयता घालतो, असे म्हणत अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, राजेंद्र बारवकर, अमित बारवकर, नागनाथ भगत व इतर अनोळखी तीन इसम यांनीही देवकाते व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी देवकाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगरसेवकांसह 6 जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.