पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने रुग्णालयाची निरिक्षण व तपासणी करण्याकरीता आलेल्या पथकाला हॉस्पिटलचे सीईओ, जनरल मॅनेजर यांच्यासह इतरांनी सरकारी कामात अडथळा आणला. सरकारी काम करीत असताना धर्मादाय हॉस्पिटलने सहाय्य करणे व कागदपत्र पुरवणे, तसेच शासनाच्या आदेशाची पुर्तता करणे क्रमप्राप्त असून देखील कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे हॉस्पिटलचे सीईओ, जनरल मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राधेश्याम हणमंतराव पडलवार (वय-35 रा. सिद्धीविनायक गार्डनिया, नऱ्हे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानंतर हॉस्पिटलचे सीईओ पामेश गुप्ता, जनरल मॅनेजर सिंग, वैद्यकीय समाज सेवक वैशाली पवार, वैद्यकीय समाज सेवक संचित सुर्यवंशी व एका अनोळखी व्यक्तीवर भादंवि कलम 186, 187, 188, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात निरीक्षक म्हणून कार्य़रत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार फिर्य़ादी यांनी 30 मे रोजी आदित्य बिर्ला हॉस्पिटल रुग्णालयाचे निरीक्षण आणि तपासणी केली होती. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने व तपासणीसाठी आवश्यक बाबी विचारत घेऊन एकूण 19 मुद्यांची माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत तपसणी समिती अध्यक्ष युमना जाधव, उपसचिव तथा विशेष कार्य अधिकारी, राज्य स्तरीय विशेष मदत कक्ष प्रतिनीधी यांच्या स्वाक्षरीने हॉस्पिटलला कळवले होते.
त्यानुसार मंगळवार 25 जून रोजी तपासणी करण्याकरिता तपासणी समिती अध्यक्ष युमना जाधव, उपसचिव तथा विशेष कार्य अधिकारी, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष, मुंबई, शरद घावटे, कक्ष अधिकारी, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, विधी व न्याय विभाग यांचे कार्यालय, नितीन गोखले, सहायक कक्ष अधिकारी (से.नि.) विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई,जिल्हा समिती सदस्य सिद्धार्थ गिरमे, रुपेश गायकवाड, अधिक्षक, रुग्णालय विभाग, धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग यांचे कार्यालय वरील सर्व समीती सदस्यासह आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल येथे तपासणीसाठी गेले होते.
यावेळी बिर्ला मेमोरियल हॉस्पीटलचे सीईओ गुप्ता, जनरल मॅनेजर सिंग, वैशाली पवार, संचित सुर्यवशी यांनी फिर्यादी व इतर करत असलेल्या सरकारी कामात अटकाव केला. धर्मादाय हॉस्पीटलने सहाय्य करणे व कागदपत्रे पुरविणे आवश्यक असताना त्यांनी कोणतेही सहाय्य केले नाही. तसेच शासनाच्या आदेशाची पुर्तता करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगुन देखील कोणत्याही आदेशाचे पालन न करता रुग्णालयातून निघून गेले. त्यांच्यातील एक अनोळखी महिलेने तपासणी पथकास दमदाटीच्या भाषेमध्ये आणि चढ्या आवाजात ‘तुम्ही आमच्या महिला कर्मचारी यांना रात्री 10.00 वा. पर्यत का थांबवून घेतले आहे. कोणत्या आदेशाने रात्री तपासणी करीत आहात’ असे म्हणत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.