लोणी काळभोर (पुणे): थेऊर (ता. हवेली) मंडलाच्या निलंबित लाचखोर व वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या एका गुन्ह्यामुळे मागील गेल्या वीस दिवसांपासून फरार असतानाच, सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी जयश्री कवडे यांच्या एका बगलबच्च्याने कवडे यांच्यासाठी एका प्रकरणात 80 हजार रुपयांची मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवारी) आणखी एक गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागातच एकच खळबळ उडाली आहे.
विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या जयश्री कवडे यांच्या सहकाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
दरम्यान वीस दिवसांपासून म्हणजेच १३ मार्चला सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजय सुदाम नाईकनवरे याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणी कोलवडी परिसरातील एका शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री कवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात कवडे यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली असली तरी, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जयश्री कवडे मात्र मागील वीस दिवसांपासून फरार आहेत.
थेऊरच्या निलंबित मंडल अधिकारी जयश्री कवडे, लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांच्यासह थेऊर मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच तलाठी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल “पुणे प्राईम न्यूज”ने मागील सहा महिन्यांच्या काळात अनेक वेळा केली होती. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांची पाठराखण करत होते. त्यामुळे एसीबीकडून झालेली ही कारवाई हिमनगाचे छोटेशे टोक असून त्याची व्याप्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. थेऊर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी तलाठी व सर्कल कार्यालयातील जुन्या खासगी लोकांची खांदेपालट करत बेकायदेशीरपणे लाच स्वीकारण्यासाठी खाजगी ‘शूटर’ ची नेमणूक केल्याची चर्चा होत होती. मात्र, आता त्यांच्या खाजगी शूटरवर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची लक्तरे निघाली आहेत.
दरम्यान वरील प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थेऊर मंडल अधिकारी यांच्याकरीता ऐंशी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विजय नाईकनवरे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वीस दिवसांच्या आत दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
लोणी काळभोर तलाठी कार्यालय, थेऊर तलाठी कार्यालय व थेऊर मंडल अधिकारी कार्यालय यामधील चुकीच्या कारभाराचा “पंचनामा” व शेतकऱ्यांकडून लाच मागितलेला व्हिडिओ व ऑडीओ क्लिपचा पुरावा “पुणे प्राईम न्यूज”ने प्रशासनासह जनतेपुढे मांडलेला होता. तसेच त्याबाबत नागरिकांनी महसूलच्या वरिष्ठ कार्यालयासह एसीबीकडे अनेक तक्रारी दाखल केलेल्या होत्या. मात्र, कागदी घोडे नाचवण्यापुढे वरिष्ठ अधिकारी काहीही करत नसल्याने नागरिकांमध्ये महसूलच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.