मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट नेमकं कोणाचं याचे गूढ उकललं आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील एका कामगाराचेच बोट असल्याचं स्पष्ट झालं आहे. सापडलेल्या बोटाच्या डीएनए चाचणीचा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आईस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळून आले. इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला होता. दरम्यान, हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी क्रशिंग मशीनवर काम करत असताना ओमकार पोटे यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांचे बोट कापले आणि कापलेले बोट आईस्क्रीममध्ये पडले होते. अपघताबाबत माहिती मिळाल्यानंतर फॉर्च्यून डेअरीने तयार झालेले सर्वच आईस्क्रीमची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र, तसे झाले नाही. हे आईस्क्रीम महिनाभराने म्हणजेच 12 जून रोजी मुंबईतील मालाड येथीला एका डॉक्टर महिलेच्या हाती लागले होते.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा आढळला होता. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचे आईस्क्रीम मागवले होते. त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. त्यामुळे महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पुण्यातील इंदापूर फॉर्च्युन डेयरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. यामध्ये कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. दरम्यान, पोलिसांनी या बोटाचे आणि कर्मचारी पोटे यांच्या डीएनएचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते.