लोणी काळभोर, ता. 7 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मागील 6 वर्षापासून बंद पडलेला कवडीपाट टोलनाक्याचा सांगाडा हा धोकादायकरीत्या रस्त्यावरच लटकलेल्या अवस्थेत होता. यामुळे लहानमोठे अपघात वारंवार होत होते. तसेच एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे हा सांगाडा काढावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर यश आले असून हा सांगाडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज बुधवारी (ता. 7) सकाळी दहा वाजण्यापासून काढण्यास सुरवात केली आहे. तर सांगाडा निघत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट व दौंड तालुक्यातील कासुर्डी या भागातील रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले होते. चौदा वर्ष आर्यन टोलरोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून टोलवसुली सुरु होती. त्याची मुदत मार्च 2019 मध्ये संपल्यावर येथील टोलवसुली बंद झाली. त्यानंतर हे दोन्ही टोलनाके बंद करण्यात आले. मात्र या दोन्ही टोलनाक्याचे सांगाडे हे महामार्गावरच लटकलेल्या अवस्थेत होते. कासुर्डी येथील टोलनाका आता काही महिन्यांपूर्वीच काढण्यात आला होता.
सहा वर्षांपूर्वी कवडीपाट टोलनाका बंद झालेला असून त्याचा सांगाडा हा अद्यापही महामार्गावरच लटकलेल्या अवस्थेत आहे. बंद पडलेल्या कवडीपाट टोलनाक्याला धडकून वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर काही जणांना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? बंद पडलेल्या टोलनाक्याचा सांगाडा कधी निघणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, कवडी पाट टोलनाक्याला धडकून अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीकोनातून या टोलनाक्याचा सांगाडा हटविणे गरजेचे होते. त्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय व पीएमआरडीए यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा सांगाडा काढावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे हनुमंत सुरवसे यांनीही हा सांगाडा काढावा. अशी प्रशासनाकडे मागणी केली होती.
अखेर लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या या पाठपुराव्याला आज यश आले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आज पासून या टोलनाक्याचा सांगाडा काढण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसात हा सांगाडा काढून कठडे हटविण्यात येणार आहेत. तसेच सांगाड्याच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याचे डांबरीकरणदेखील करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. तर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहे.
नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
कवडीपाट टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. हे फ्लेक्स धोकादायकरीत्या महामार्गावर वारंवार लटकत होते. या मार्गावर नेहमी रहदारी असल्याने कवडीपाट टोलनाक्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत होती. त्यातच, टोलनाक्याच्या सांगाड्याच्या खालून गाडी चालविताना हा सांगाडा पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे वाहनचालकांना येथून जाताना भीती वाटत होती. परंतु, प्रशासनाने हा टोलनाका काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.