पुणे: पुणे जिल्ह्यातील गौण खनिजे उत्खनन, दगड खाणी, वाळू उपसा आणि वाहतुकीसंदर्भात नेमण्यात आलेले बेकायदा आणि वादग्रस्त भरारी पथक अखेर बरखास्त करण्यात आले आहे. मंगळवार २७ जून रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी एका भरारी पथकाची स्थापना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आली होती. परंतु, पथकातील एका तहसीलदाराच्या कामकाजावर दगडखाण संघटनेने अनेक गंभीर आरोप केले होते. संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांची चार दिवसांपूर्वी भेट घेऊन याबाबत निवेदन देत बेमुदत संप पुकारला होता.
दगडखाण संघटनेच्या या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हाधिकारी मोरे यांनी हे भरारी पथक बरखास्त करण्याचे आदेश गुरुवारी काढले.