मावळ : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि तीन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कंटेनर चालकासह तिन्ही कार मधील प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हा भीषण अपघात कामशेत येथे आज (1 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कामशेत येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरची समोर जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता कंटेनर जाग्यावर पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालकासह तिन्ही कार मधील प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास वाहनांची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.