पुणे: पुरंदर तालुक्यात आतंरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. मात्र, याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होत आहे. सध्या शासनाकडून आतंरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या विमानतळामुळे बाधित सातही गावांमधील शेतकऱ्यांकडून या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. यावेळी सर्वेक्षणादरम्यान अधिकाऱ्यांची वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत. शासन-प्रशासनाच्या या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी व स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे.
सध्या पुरंदर विमानतळासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यात जनावरे तसेच बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता. तेंव्हा आंदोलनकारी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा निषेध केला आहे.
पुरंदर विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती दिसत आहे. तेथील शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.