लोणी काळभोर : अवैध ताडी विक्रीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात बुधवारी (ता.२०) छापा टाकला. या छाप्यात ९० लिटर तडीसह मुद्देमाल जप्त केला. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक संजय कोल्हे यांनी दिली.
याप्रकरणी बसवराज नरसय्या भंडारी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात व कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा परिसरात अवैध ताडीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, माळीमळा परिसरात छापा टाकला असता तेथे बसवराज भंडारी हा ताडी विकताना आढळून आला. त्याच्याकडून ९० लिटर ताडीसह विक्री साहित्य असा सुमारे साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक बी. जी. रेडेकर करत आहेत.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपला मोर्चा थेऊरफाटा परिसरात वळवला असून, या ठिकाणी छापा टाकला असता तेथे कोणताही मुद्देमाल आढळून आलेला नाही. ही कारवाई संजय कोल्हे व दुय्यम निरीक्षक ए. ए. औटे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जी. रेडेकर, अमोल कांबळे, संतोष गायकवाड, दत्तात्रय आबनावे व महिला जवान प्रिया चंदनशिवे यांच्या पथकाने केली.