पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता दोन्ही बाजू, शनिवारवाडा ते स्वारगेट चौक रस्ता, पदपथावरील फ्रंट व साइड मार्जिन बांधकाम विकास व अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाई करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे महापालिका आयुक्त यांनी वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार आज (शुक्रवार, दि. ९) अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विकास विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये रस्ता व पदपथावरील, तसेच इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये पाच हजार ५०० चौ.फू. कच्चे पक्के शेड मोकळे केले. तसेच, टेबल, खुर्चा. टेंट, काऊंटर, तसेच पथारी साहित्य जवळपास ८ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन हातगाड्या, ६ पथारी, इतर ४८ आणि ७ शेडवर कारवाई करण्यात आली. कारवाई यापुढेदेखील मोठ्याप्रमाणात सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.