ओझर: ओझर येथे विवाह सोहळा व सर्व धार्मिक विधी उरकून नवविवाहित जोडपे सातारा येथे कारने परतत असताना नारायणगावच्या दिशेने ओतूरकडे येणाऱ्या भरधाव कारने समोरून धडक दिल्याने दोन्ही गाडीतील आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नारायणगाव येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी साडेचार पाचच्या दरम्यान झाला. प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले की, ओतूर येथील चारचाकी भरधाव वेगात येऊन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याच्या गाडीला जोरदारपणे धडक दिली. त्यात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले असून यातील आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नारायणगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
दरम्यान कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या दोन्ही कार एकमेकांवर आदळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान दोन्ही कार समोरासमोर येऊन झालेल्या अपघातात टाटा पंच गाडीतील नववधू जखमी झाली आहे. घटनास्थळी ओतूर पोलिसांनी धाव घेत जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताठे करत आहेत.