उरुळी कांचन (पुणे) : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, लोणी स्टेशन, उरुळी कांचनसह परिसरातील छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये सजावटीसाठी तसेच बाजारात राम मंदिर आकाशकंदील, अयोध्येतील मंदिर आणि राममूर्ती तसेच इतर वस्तूचे स्टिकर्स दाखल झाले आहेत.
प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास कापून अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी मार्गावर दीप प्रज्वलित करण्यात आले होते. पौराणिक आकाशकंदील लावण्यात आले होते. संपूर्ण अयोध्यानगरी प्रकाशमय करण्यात आली होती. तो दिवस आजही दिवाळी म्हणूनच ओळखला जातो. यावर्षी जानेवारीतच दिवाळी साजरी होत आहे. अयोध्येतील राममंदिर निर्माण होऊन प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रूपात श्रीरामाचे अयोध्येतील मंदिरात आगमन होणार आहे. हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही. म्हणूनच दिवाळीप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी विविध माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा सप्ताह साजरा केला जात आहे.
घरोघरी, मंदिरांवर सजावट करण्यात येत आहे. बाजारात दिवाळीप्रमाणेच राममंदिर प्रतिकृती प्रतिमा, प्रभू श्रीराम, रामायणातील अन्य दृश्य छापील आकाशकंदील बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रथमच राममंदिरसह परिसरातील विविध वास्तू, श्रीराम प्रतिमा, हनुमान यांची प्रतिमा, झेंडे, तोरण अशा विविध वस्तूंचे स्टिकर सेट, रामाची प्रतिमा असलेले कापडी झेंडे, मफलर, टोपी अशा अनेक वस्तू विक्रीस आल्या आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असून, दुकानाबाहेर लावलेले आकाशकंदील नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.
फ्लेक्स प्रिंटींगला ‘अच्छे दिन’…
लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील फ्लेक्स प्रिंटींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘अच्छे दिन’ आले आहेत. काही नागरिक स्वतःच्या चारचाकी व दुचाकीवर श्रीराम प्रतिमा असलेले फ्लेक्स लावलेले दिसून येत आहेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांवर फ्लेक्स लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फ्लेक्स प्रिंटींग व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे.
लोणी काळभोर व उरुळी कांचन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त रामायण, भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण, संगीतमय सुंदरकांड, रांगोळी, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद व दीपोत्सव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दत्तमंदीर ते तीर्थक्षेत्र रामदरा दरम्यान प्रभु श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात महाआरती
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात दुपारी बारा वाजता महाआरती होणार असून, त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. उरुळी कांचन देवस्थान संस्था, सप्ताह समिती व समस्त उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून (ता. १५) भावार्थ रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.