उरुळी कांचन, (पुणे) : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात शनिवारी (ता. 14) दत्त जयंती भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
अभिषेक, पूजा, काकडा आरती, पालखी, दिंडी, मिरवणूक, भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी जयंती भक्तिमय वातावरणात साजरी झाली. जयंतीनिमित्त विविध गावांमध्ये दत्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताका व फुग्यांची सजावट करून विद्युत रोषणाई करीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील मंदिर सजविण्यात आले होते. दर्शनासाठी नागरिकांच्या सर्वच ठिकाणी रांगा लागल्या होत्या.
कदमवाकवस्ती येथे दत्त मंदिर व पीर येथे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी सहा वाजता महाअभिषेक, आठ वाजता श्री दत्त गायत्री व स्वामी गायत्री यज्ञ पार पडला. तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या दत्त मंदिरात उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार बापूसाहेब मत्रे, अमोल खांडेकर धनंजय भोसले, सुदर्शन माने, अनिल खोमणे, महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ, मनीषा सांगळे, सुप्रिया काळे, आदि पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते.
श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन आयोजित तुपे वस्ती येथे दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्तजन्म सोहळा होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुदत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तुपे, उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कस्तुरी मंगल कार्यालयाच्या महिलांनी पाळणा म्हणत दत्त जन्म सोहळा साजरा केला. या वेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कोरेगाव मूळ येथे आदर्श सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बोधे काकडेवस्ती येथे दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी भजन, कीर्तन, महाप्रसाद, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दरम्यान, दिवसभरात भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलावर्गाने दत्तजन्म सोहळ्यानिमित्त एकत्रित येऊन पाळणा, नाव ठेवणे असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले.