शिक्रापूर : राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक मोफत सुविधा पोहचविण्यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना शासनाने केली आहेत. गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्यात म्हणून शासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. मात्र पारोडी (ता. शिरूर) येथील आरोग्य उपकेंद्र चक्क दिवसाढवळ्या बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पारोडी (ता. शिरुर) येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून दोन मजली इमारत बांधली आहे. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या उपकेंद्रात डॉक्टर व कर्मचारी वारंवार गैरहजर राहत आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे . तसेच नागरिकांना प्राथमिक उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत कसा होणार असा प्रश्नही नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहेत.
रुग्णांच्या खिशाला बसते झळ
सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आल्यानंतर रुग्णालय बंद असते. किंवा डॉक्टर उपस्थित नसतात. परिणामी रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचे नुकसान होते.
स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी
कामात कुचराई व हजर नसणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करा. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याने कामावर नसतानाही हजेरी दाखवून कर्मचाऱ्यांचे पगार नक्की कोण करत? वरीष्ठ अधिकारी नेमके काय करतात? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पारोडी हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून शिवतक्रार म्हाळुंगी, सातकरवाडी, कोकरेवस्ती, येळे वस्ती, पिराची वस्ती, या ठिकाणांहून नागरिक उपचारासाठी येतात. मात्र, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलल्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे झालेले निलंबन यामुळे आधीच सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांची विश्वासहर्ता पणाला लागली आहे.
पारोडी येथील सरपंच कमल शिवले म्हणाल्या, याआधीही ग्रामपंचायत कडून दवाखान्याला लेखी पत्र देण्यात आले होते. पुन्हा संबंधित वरिष्ठांना या विषयावर ग्रामपंचायतमार्फत पत्रव्यवहार केला जाईल.
पारोडी येथील ग्रामस्थ ज्ञानेश्वर टेमगिरे म्हणाले, डॉक्टर वेळेत उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. कधी दवाखाना बंद असतो तर कधी दवाखाना चालू असून डॉक्टर नसतात. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.