पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी रणनीतीही आखली आहे. पण, असे असताना या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, अशा आशेवर अनेक इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी काही प्रबळ दावेदार असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. काहींनी तर ही नाराजी उघड व्यक्तही केली. यात उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीही वाढली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 पैकी 19 मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे पाहिला मिळाले.
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी आणि बारामती हे मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरीला उधाण आले आहे. पुणे शहर, जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील मतदारसंघामध्ये बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आता चांगलीच कसरत करावी लागत आहे. मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये अनेक इच्छुकांनी आपापले अर्ज दाखल केले. तर बारामती विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे अजित पवार आणि महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघात बंडखोरी झालेली नाही.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे असो किंवा महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यामध्ये जागावाटपावरून रस्सीखेच दिसून आली होती. याचाच परिणाम बंडखोरीतून दिसून आला. या पक्षांनी जागा वाटप केल्याने महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
काँग्रेसमध्येच दिसून आली सर्वाधिक बंडखोरी..
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या आठही मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी उमदेवारी अर्ज भरला आहे. शिवाजीनगर काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. याशिवाय, पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल, काँग्रेस व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष भरत सुराणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे यांनी बंडखोरी केली आहे. कोथरूड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अर्ज भरला आहे.
पुणे जिल्ह्यातही वाढले बंडखोरीचे प्रमाण..
पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात सर्व पक्षांनी आघाडी उघडली आहे. येथे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यासह अन्य पक्षांनी बापूसाहेब भेगडेंना पाठिंबा दिला आहे. जुन्नर विधानसभेतून भाजपच्या आशा बुचके यांनी तर शिवसेना उबाठाचे माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय, भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीमध्ये बंडखोरी केली.
आंबेगाव, इंदापूरलाही बंडखोरीची ग्रहण..
आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष अथर अब्बाल हुसेन इनामदार, अशोकराव काळे यांनी अपक्ष अर्ज भरला. शिवसेना उबाठातर्फे सुरेखा निघोट यांनीही अर्ज भरला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रवीण माने यांनी बंडखोरी केली. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इंदापुरातून मनसेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे.
खडकवाल्यात इच्छुकांची संख्या जास्त..
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले यांनी बंडखोरी केली आहे. ढमाले यांनी भोरमधूनही अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे हरिश्चंद्र दांगट यांच्या पत्नी अनिता दांगट, नागेश शिंदे यांनी तर काँग्रेसचे मिलिंद पोकळे, राहुल मते यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.