पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले असून ३ आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून तब्बल साडेतीन कोटींचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहे. त्यांच्या परदेशी साथीदारांच्या मागावर गुन्हे शाखेची १० पथके रवाना झाली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली.
पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री केली जात होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वैभव आणि हैदर हे दोघे डिलिव्हरी देण्याचे काम करत होते. दरम्यान, दोघांनी हे अमली पदार्थ सॅम आणि ब्राऊन नावाच्या परदेशी नागरिकांना मुंबईला डिलिव्हरी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार परदेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त (गुन्हे) सुनील तांबे आणि सतीश गोवेकर उपस्थित होते. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, उपनिरीक्षक रमेश तापकीर यांच्या पथकाने केली.
असा झाला उलघडा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट १ च्या पथकाला सोमवार पेठेत एक चारचाकीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा एमडी ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे एक कोटीचे एमडी आढळून आले. पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी एमडी देणाऱ्या हैदर शेखची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी हैदर शेखला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्याकडे एक कोटीचे एमडी आढळून आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याच्या मिठाच्या गोडाऊनमध्ये आणखी दीड कोटीचे एमडी सापडले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.