संदीप टूले
केडगाव : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील एकूण ४० तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर (सासवड) हे गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके तर दौंड, इंदापूर व शिरुर हे तालुके निम स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके असल्याचे यादीत जाहीर केले आहे.
यंदा दौंड तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक भागात तर अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यातील दक्षिण भागातील गाव खोर, भांडगाव, देऊळगावगाडा, भरतगाव पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, कौठडी आदी दुष्काळी गावांतील गाव तलाव विहिरी, बोअरवेल सध्या पाण्याअभावी कोरडे पडू लागले आहेत. तर काही ठिकाणी विहिरीमधील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.
निम दुष्काळी तालुका जाहीर झाल्याचे फायदे
जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदींचा लाभ दौंड तालुक्याला मिळणार आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी
दौंड तालुक्यातून गेलेल्या खडकवासाला कालव्यातून पाण्याचे आवर्तन जनाई शिरसाई योजनेअंतर्गत सोडून गाव तलाव, ओढे भरल्यास तात्पुरता का होईना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दौंड तालुका निमदुष्काळी असल्याने राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहेत.