-बापू मुळीक
सासवड : सद्यस्थितीतील सिताफळ बागेचे अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन, सीताफळ भेगाळणेची समस्या व उपाय यावर मार्गदर्शन तसेच चालू वर्षी समाधानकारक पर्जन्यमान असल्याने अंजिराच्या मीठा बहराचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन उद्यानविद्यावेत्ता डॉ. प्रदीप दळवे यांनी यावेळी केले.
काळेवाडी येथे शिवार फेरीचे आयोजन अखिल भारतीय समन्वित अंजीर सिताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी व कृषी विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि पुरंदर तालुका सिताफळ बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे काळेवाडी येथे पुरंदर तालुका सिताफळ बागायतदार संघाचे अध्यक्ष निलेश काळे, यांच्या सिताफळ व अंजीर बागेमध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांच्या अनुभवाची देवाण घेवाण झाली.
अंजीर व सीताफळ पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सिताफळावरील पिठ्या ढेकूण व्यवस्थापन, सिताफळ काळे पडणे व उपाय, मीठा बहर व्यवस्थापन करताना बोर्डो मिश्रणाचा वापर या विषयावर डॉ. युवराज बालगुडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले.
यावेळी विजय कोलते, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे, पुरंदर तालुका सिताफळ बागायतदार संघाचे पदाधिकारी, माऊली मेमाणे, आदिनाथ काळे, अमित काळे, मंगेश लवांडे, भाऊ टिळेकर, प्रदीप काळे, अरुण काळे, उमेश झेंडे, समीर काळे, रवींद्र काळे, गणेश काळे, राहुल झेंडे आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि सहाय्यक योगेश पवार व कोंडीबा जरांडे तसेच परिसरातील अंजीर व सीताफळ उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.