उरुळी कांचन, (पुणे) : डॉ. तानाजी घारे यांनी उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांसाठी तब्बल चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ माफक व सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यांच्या जाण्याने उरुळी कांचनसह परिसराचे मोठे नुकसान झाल्याची खंत डॉ. ए. एस. अष्टेकर व डॉ. गोडसे यांनी व्यक्त केली.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नामंकित डॉक्टर तानाजी लक्ष्मण घारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचनच्या वतीने शोकसभेचे आयोजन मनिश्री कृष्ण सहकार संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी अष्टेकर बोलत होते. डॉ. तानाजी घारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला होता.
यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित बाबा कांचन, वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संतोष राठोड व खजिनदार डॉ. समीर ननावरे, डॉ. शरद गोते, पूर्व हवेलीतील नामांकित डॉक्टर व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.
डॉ. समीर ननावरे म्हणाले, “डॉ. घारे हे वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सेवा देणारे माणसातील देवमाणूस होते. उरुळी कांचनसारख्या ग्रामीण भागात ४० वर्ष वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या जाण्याने कधी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. रुग्णाकडे पैसे असू किंवा नसू प्रामाणिकपणे त्यांची सेवा डॉक्टरांनी केली आहे.”
दरम्यान, डॉक्टर तानाजी घारे यांच्या आठवणींना उपस्थित मान्यवरांनी उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी डॉक्टर घारे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शरद गोते यांनी केले तर नियोजन डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष राठोड व खजिनदार डॉ. समीर ननावरे यांनी केले.