उरुळी कांचन : कांद्याच्या निर्यातबंदीबाबत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा करा पण गदारोळ हे कारण देऊन मला व सलग आठवेळा संसदरत्न ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेतून निलंबित केले. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत जुन्या एलाईट चौकात शनिवारी (ता. ३०) दुपारी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), व कॉंग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, ज्येष्ठ नेते के. डी. कांचन, सोपान कांचन, देविदास भन्साळी, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, भवरापूरचे सरपंच सचिन सातव, टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, सुभाष टिळेकर, विकास लवांडे, विजय तुपे, रामभाऊ तुपे, अर्जुन कांचन, सविता कांचन, योगिनी कांचन, प्रकाश म्हस्के, संदीप गोते, काका कुंजीर, काळूराम मेमाणे, राजेंद्र टिळेकर, आप्पा डोंबे, स्वराज तुपे, अजिंक्य तुपे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, “शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाल्यापासून शेतकरी, दुधउत्पादक, व सर्वसामान्य नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या हक्कासाठी मागण्यांसाठी कायम लढत राहीन”, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार कोल्हे यांची बैलगाडीतून मिरवणूक
अमोल कोल्हे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत आले असता त्यांची तळवडी चौकातून ते एलाईट चौकापर्यंत बैलगाडीत मिरवणूक काढण्यात आली. तसेच कोपरा सभेच्यावेळी कांद्याची माळ देऊन राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत निवेदन देऊन निषेध नोंदवला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली. आभार सुभाष टिळेकर यांनी मानले.
‘शेतकरी आक्रोश’साठी उरुळी कांचनचे ग्रामपंचायत कर्मचारी वेठीस
उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शेतकरी आक्रोश मोर्चासाठी वेठीस धरण्यात आले होते. ग्रामपंचायत कर्मचारी हे महाविकास आघाडीतील पक्षाचे झेंडे ठिकठिकाणी लावण्याचे काम करत होते.
आयोजकांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत. याबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करून मोर्चाच्या आयोजकांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
– जनार्दन दांडगे, अध्यक्ष, भाजप सोशल मीडिया, पुणे जिल्हा