पुणे : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी गावात साडेतीन महिन्यांपूर्वी दरड कोसळून भीषण दूर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये शेकडो ग्रामस्थ मातीच्या ढीगाऱ्याखाली गाढले गेले. अनेक मुलांचे पालक त्यांना सोडून गेले. यामुळे अनाथ झालेल्या इरशाळवाडीतील मुला-मुलींनी शुक्रवारी तुळशीबागेत दिवाळी खरेदीचा आनंद लुटला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत मनमुराद खरेदी करत, त्यांनी दिवाळसण ‘गोड’ केला.
राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदे मातरम् संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आणि जय गणेश व्यासपीठातर्फे दरडग्रस्त इरशाळवाडीतील मुला-मुलींसाठी ‘पुण्याची दिवाळी सहल आणि आनंद मेळा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी ४५ मुला-मुलींना बिस्किटे, सुका मेवा, वेफर्स, चाॅकलेट देण्यात आले. या मुलांनी गणेशोत्सव कार्यकर्त्यांसमवेत आईस्क्रीमचा स्वाद घेण्याचा आनंद लुटला. शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, वैभव वाघ, अश्विनी शिंदे, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित या वेळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, इरशाळवाडी दूर्घटनेमध्ये शेकडो ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इरशाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी पाहणी करून, त्याठिकाणी तत्काळ उपयोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. आता येथील मुले-मुली पुन्हा शाळेत जात आहेत. त्यांनी शिकून मोठे व्हावे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करावे यासाठी आवश्यक ती मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल.
दरम्यान, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाने प्रेमाने या सर्व मुलांचे आदरातिथ्य केले आहे. दिवाळीनिमित्त खरेदीचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असेच आपण सर्व या मुलांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे कायम त्यांच्यासोबत राहणे गरजेचे आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.