Diwali 2023 : पुणे : राज्यासह देशात दिवाळीची लगबग सुरु आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात लोक मिठाईंकडे जास्त आकर्षिले जातत. मागणी वाढल्याने दुकानदारही मागे-पुढे न बघता भेसळीचा दणका उठवतात. त्याचा आरोग्यावर धोका दिसून येतो. या पार्श्वभूमीवर या दिवाळीत मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दुकानदारांना या दिवाळीच्या काळात दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशभरात 4000 राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दुकानदारांवर निगरानी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खाद्यपदार्थांमध्ये स्टार्च,फॉर्मेलिनचा वापर : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात बाजारात विकल्या जाणाऱ्या मिठाईत स्टार्च मिसळला जातो. दिवाळीत तर मिठाईत भेसळ करताना या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च मिसळला जातो. स्टार्चचे जास्त प्रमाण मूत्रपिंड आणि यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहे. कधी-कधी मिठाईमध्ये फॉर्मेलिनचाही वापर केला जातो. फॉर्मेलिन वापर सामान्यतः मृतदेह दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. मिठाईमध्ये फॉर्मेलिन सारखे केमिकल वापरणे अत्यंत हानिकारक ठरते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला : मिठाईमध्ये स्टार्च, फॉर्मेलिनचा वापर आपल्या आरोग्यावर गंभीर परिणामकारक ठरू शकतो. यामुळे स्त्रियांना गरोदरपणामध्ये काही समस्या उद्भवू शकतात किंवा दिव्यांग मूल जन्माला येऊ शकते. त्यामुळे आईच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.
बनावट मिठाईपासून कसं वाचाल? : बनावट खाद्यपदार्थांपासून वाचण्यासाठी शक्य तितक्या वेळा बाहेरील गोडपदार्थ मिठाई खाणं टाळा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मिठाई घरी बनवण्याचा प्रयत्न करा. मिठाईऐवजी सुक्या मेव्याचा वापर करा. मिठाई खरेदी करायची झाल्यास भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मानांकित दुकानातून खरेदी करा. जिथे स्वच्छता आणि गुणवत्तेची हमी असेल, अशा ठिकाणीच मिठाई खरेदी करा.