पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच 58 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर सोमवारी राज्य सरकारकडून 7आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सी.एल. पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव यांच्याकडे सहकार आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची देखील बदली झाली आहे.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. साखर आयुक्त म्हणून कार्यरत होते. डॉ. पुलकुंडवार हे मूळचे नांदेडचे असून त्यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेचे आयुक्त, रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून देखील काम पहिले आहे. २००८ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केले होते.
या सात अधिकाऱ्यांची झाली बदली
सौरभ राव – विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल एम. कवडे – आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल पाटील – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यशनी नागराजन – प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव, सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, छत्रपती संभाजी नगर
मुरुगनंथम एम – प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डी.के. खिल्लारी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.