पुणे (Pune): पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन आणि सुरक्षा विभागातील भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवारी (दि. ९) दुपारी पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि कार्यकारी अभियंता सदानंत लिटके यांच्यात जोरदार वादावादी झाली. बनकर यांनी शिवीगाळ करून आपला मोबाईल फोडल्याचा आरोप लिटके यांनी केला आहे. तर अभियंता लिटके यांनी माझ्या कार्यालयात घुसून शिवीगाळ केल्याचा आरोप बनकर यांनी केला आहे.
दरम्यान, बनकर यांच्या कार्यालयातून जोरात आवाज येऊ लागताच इतर पालिका कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून हा प्रकार सोडवला. पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या धरपकडीची चर्चा पालिकेत दिवसभर होती. दरम्यान बनकर आणि लिटके या दोघांकडून पालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबत आयुक्त काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागामार्फत १०० सुरक्षारक्षकांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून निविदा न काढता नेमणूक करण्यात आली आहे. या सुरक्षारक्षकांना देण्यात येणाऱ्या पगारावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. यापूर्वी सोमनाथ बनकर यांनी धमकी दिल्याचा दावा लिटके यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत बनकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी शुक्रवारी माझ्या स्थायी समितीमधील कार्यालयात कामकाज करीत असतना लिटके यांनी माझ्या कार्यालयात घुसून शिवीगाळ केली आहे. पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण आणि सुरक्षा विभागाच्या एकूणच कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगळी चर्चा पालिकेत सुरू आहे.