गणेश सुळ
केडगाव : चालू हंगामात लागवड केलेल्या वातावरण बदलामुळे गहू, कांदा, हरभरा या पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. गव्हाच्या ओंब्यात पिवळेपणा वाढला आहे. तसेच मर रोगाचाही प्रादूर्भाव वाढल्याने पिकांची वाढ देखील खुंटली आहे. कांदा पिकाचे शेंडे वाकडे होत आहेत. त्यातच कांद्याचे बाजारभाव महिनाभरात ७० टक्क्यांहून कमी झाले आहेत.
दौंड तालुक्यातील खुटबाव, केडगाव, पिंपळगाव, राहू परिसरात काही शेतकऱ्यांनी गव्हाची उशिरा पेरणी केली होती. हा गहू अचानक पिवळा दिसू लागला आहे. तसेच मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. अवकाळी पावसानंतर हरभऱ्यावर मर रोग आल्यावर अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मोडून गव्हाची पेरणी केली. मात्र, आता त्यावरही संकट ओढवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
खरिपाचा हंगाम हातचा गेला. आता रब्बीमध्ये चांगल्या उत्पन्नाच्या हेतूने हरभऱ्याची लागवड केली. मात्र, यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे हे पीक काढून गव्हाची लागवड केली. आता त्यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव वाढला व गव्हाची वाढ खुंटली आहे. यामुळे हा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.