पुणे : शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचा कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला या तीन जागांवरील पेच सुटत नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी (दि. २३) केंद्रीय हवाई राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सागर बंगल्यावर भेट घेतली. पुण्यातील महायुतीच्या जागावाटपात भाजपने आघाडी घेतली आहे. रविवारी (दि. २०) सकाळीच पुण्यातील पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. भाजपकडून तीनही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातील इतर मतदारसंघापैकी कसबा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. याठिकाणी अजूनही कोणाचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. भाजपची पहिली यादी जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही अजून उमेदवार जाहीर होत नसल्याने उत्कंठा वाढली आहे. त्यात कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंटमधून विद्यमान आमदार सुनील कांबळे यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांना महामंडळ देण्यात आले आहे. त्यामुळे कांबळे यांना उमेदवारी देण्याऐवजी अन्य पर्यायाचा विचार सुरू आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मोहोळ हे सागर बंगल्यावर पोहचले होते. पुण्यातील उर्वरित जागाबाबत त्यांनी चर्चा केली आहे.