शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे उभे ठाकले आहेत. आढळराव पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद आढळरावांच्या पाठीश उभी राहणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. परंतु, मंत्री दिलीप वळसे पाटलांना दुखापत झाल्याने ते मागील काही दिवसांपासून प्रचारात सक्रिय नव्हते. आता वळसे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “माझी प्रकृती आता एकदम व्यवस्थित आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये प्रकृतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. आता मी माझ्या मतदारसंघात जाऊन सुरुवातीला जनतेची चौकशी करणार आहे. तसेच पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहे. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वासही दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यामध्ये एका दुर्घटनेत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तसेच त्यांचा हातही यामध्ये फ्रॅक्चर झाला होता. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते.