राहुलकुमार अवचट
यवत : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यवत येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे आषाढ यात्रेस काल पासून सुरुवात झाली. काल सोमवार असल्याने भाविकांची तुरळक गर्दी होती, परंतु आज मंगळवार असल्याने आखाडा यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने देवीची अलंकार पूजा व आरती करण्यात आली.
यवतची श्री महालक्ष्मी माता अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने नवस फेडण्यासाठी अनेकांनी जेवणावळीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच मंदिराच्या परिसरात स्वयंपाकासाठी महिलांची लगबग चालू होती. तर दुपारनंतर पाहुण्यांची गर्दी होऊ लागली, व सर्वत्र आखाड यात्रेनिमित्त पंगती चालू असल्याचे चित्र निर्माण झाले. आखाड यात्रा, जेवणावळी व आलेले पाहुणे यामुळे श्री महालक्ष्मी माता मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.
दरवर्षी गुरुपौर्णिमा ते आषाढ अमावस्या याकाळात श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी गुरुपौर्णिमेदिवशी प्रथमच वनभोजनासाठी गाव बंद असल्याने अनेक यात्रेकरूंची तारांबळ झाली. परंतु आज मंगळवार असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.