पिंपरी-चिंचवड : दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. असाच एक प्रकरा देहुरोड येथे घडला आहे. देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पाच जणांकडून तब्बल 41 लाख रुपये घेऊन पतीपत्नीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हॉस्पिटल चालक दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय दत्तु महाडिक (वय 34, रा. नवी सांगवी) यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीष नागेश डोईफोडे आणि पत्नी पूजा मनीष डोईफोडे या पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नोव्हेंबर 2022 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे शुभश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचे चालक डॉ. मनीष डोईफोडे असून त्यांनी फिर्यादी विजय महाडिक व सतीश महाजन यांना सांगितले की, हे हॉस्पिटल 36 बेडचे आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत, मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने खूप बिझनेस होऊ शकतो, असे सांगत फिर्यादी विजय महाडिक यांचा विश्वास संपादन केला. यावेळी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टाकण्यासाठी महाडिक यांच्याकडून अकरा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.
त्याचबरोबर शुभम बाबुराव हरणे यांच्याकडून मेडिकल शॉप टाकण्यासाठी 11 लाख रुपये घेतले. तसेच रोहन संतोष निंबळे यांच्याकडून पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी सहा लाख रुपये तर प्रवीण रोशन नवले यांच्याकडून पॅथॉलॉजी टाकण्यासाठी दहा लाख रुपये घेतले. याबरोबरच सिद्धार्थ संजय बरळ यांच्याकडून मेडिकल शॉप टाकण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन त्यांची देखील फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
असे एकूण पाच जणांची फसवणूक डॉ. पतीपत्नी यांनी केली आली आहे. याप्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.