पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता बंद फ्लॅट फोडून किंमती ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना डेक्कन, कोरेगांव पार्क, वडगाव शेरी तसचे हडपसर परिसरात घडली आहे. चोरट्यांनी तब्बल 10 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आदित्य तापडीया यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आदित्य तापडीया हे प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. दरम्यान, ते दोन दिवसांपुर्वी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बाथरूमच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला. त्यावेळी घरातील बेडरूममधील कपाटातून 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून चोर पसार झाला होता. तक्रारदार शनिवारी घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
यासोबतच हडपसर भागातील पापडे वस्ती परिसरातील फ्लॅट फोडून त्याजागी चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रितेश भीमरावजी पिसे (वय 37) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.