संतोष पवार
पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडुन (एससीईआरटी) शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत (SQAAF) स्वयंमूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आता ही माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
या स्वयंमूल्यांकनातील 128 मानकांची माहिती भरणे आणि छायाचित्रे, चित्रफिती जोडण्याच्या कामात शिक्षकांची दमछाक होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) तयार केला आहे. त्यानुसार या प्रक्रियेसाठीचा ऑनलाईन दुवा उपलब्ध करून देत शाळांना स्वयंमूल्यांकनासाठीची माहिती भरणे, छायाचित्रे, चित्रफिती दिनांक 10 एप्रिलपर्यंत जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्या परिपत्रकानुसार आतापर्यंत राज्यातील सर्व शाळांची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आसून 10 एप्रिल पर्यंत ही माहिती भरणे आवश्यक आहे .