संदीप टूले
दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी, गलांडवाडी, खुटबाव ग्रामपंचायत हद्दीतून खाडे अनाथ मुलांच्या वस्तीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील पाच वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. मात्र स्थानिक नेते, पुढारी, लोकनेते या रस्त्यावरून वारंवार जात असूनहि कोणीही या रस्त्याबाबत ब्र काढायाला तयार नाही.
याच रस्त्याने वसतिगृहाकडे स्थानिकासह शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. एकेरीवाडी, देलवडी मांढरे वस्ती (गलांडवाडी) सह इतर गावातील नागरिक याच रस्त्याने केडगाव पेठेला येतात. हा एकमेव कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तसेह या अनाथ मुलांच्या वसतिगृहात वाढदिवस साजरा करायला येणाऱ्या अधिकारी, तालुका पातळीवरील पुढारी, नेते मंडळीची वर्दळ नेहमीच असते पण या रस्त्याची दुरवस्था यांना का दिसत नाही असा प्रश्न स्थानिकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे.
हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरील खडी बाहेर आली आहे. जागोजागी एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडले आहेत. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साठते. त्यामुळे पावसानंतर तर या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येऊन या रस्त्यावर चिखल होत आहे. प्रामुख्याने दुचाकीधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेवून गाडी चालवावी लागते. स्थानिक काही ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार ही केला असूनही अधिकारी जाणूनबुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
याबाबत बोलताना एकेरीवाडी येथील नागरिक मोहन टूले म्हणाले, “तिन्ही गावच्या सीमा या रोडवर आहेत. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतने या रस्त्यासंदर्भात याचा पाठपुरावा करायचा व जबाबदारी घ्यायची म्हणून ह्या रोडचे काम गेली १० वर्ष रखडलेले असावे असे आम्हला वाटते.”