संदीप टूले
केडगाव, (पुणे) : दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा पडला असून, येथील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाला करण्यात आली आहे.
काळेवाडी येथील बंधाऱ्यावर या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेती ही अवलंबून आहे. येथील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर नेहमीप्रमाणे कपासी, बाजरी, मका व जनावरांसाठी लागणारा चारा या पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी दोन्हीही बंधाऱ्यामध्ये सोडण्यात यावे, यासाठी सतत मागणी करत आहे.
या बंधारामध्ये पाणी आलं तरच आसपासच्या विहिरी व बोअरवेलच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
याबाबत बोलताना हिंगणीबेर्डी काळेवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड म्हणाले, “काळेवाडी येथील बंदरावर हिंगणीबेर्डी व काळेवाडी या गांवाना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. सध्या साठवण बंधाऱ्यामध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची अतिशय गरज आहे.”
,