Daund News : लोणी काळभोर (पुणे) : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दौंड पोलिसांनी दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून तब्बल ३ लाख ७२ हजार ७५० रुपये किमतीचा २५ किलो गांजा जप्त केला आहे.
३ लाख ७२ हजार ७५० रुपये किमतीचा २५ किलो गांजा जप्त
या प्रकरणी पोलिसांनी सपन बेनीत बीर (रा. अटली मा ता. नवगाडा जि. गजपती राज्य ओरिसा) यास अटक केली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.
पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत असताना त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार आहे. या माहितीच्या आधारे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस स्टेशनचे पथकाने दौंड रेल्वे स्टेशन येथे जावून छापा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, सपन बीर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेले गठ्ठ्यांमध्ये एकूण २४ किलो ८५ ग्रॅमचा तब्बल ३ लाख ७२ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा मिळून आला.
सदराची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, अजित भुजबळ, हेमंत विरोळे, रामदास बाबर, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मुकुंद कदम यांनी केली आहे.