गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यात मुळा-मुठा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी जिरायतीसह बागायती भागातील पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा, मुठा तसेच भीमा नदीला या वर्षी एकदाही पूर न आल्याने, तालुक्यातील शेतकरी लांबलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल
पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाला कसरत करावी लागत आहे. विद्युत पंपातून शेतीसाठी पाणी खेचता यावे यासाठी शेतकरी पाइप नदीपात्रामध्ये लांबवताना दिसत आहेत. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्याचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्याची वेळ येते. यंदा विद्युत पंपाचे पाईप लांबाविण्याची वेळ आली आहे. (Daund News) ऐन पावसाळ्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. यात भर म्हणून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धावपळ होत आहे. दौंड तालुक्यात या वर्षी १४,८२० हेक्टर उसाची लागवड झाल्याचे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.
दौंडमध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन घटणार आहे. परंतु पाऊस न झाल्याने आतापासूनच या उभ्या ऊस पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. अगदी कमी वाढ झालेली उसाची पिके तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वच पिकांवर उन्नी या रोगाचा प्रादूर्भाव वाढत आहे. दरवर्षी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे ऐन पावसाळ्यात बंद असतात. (Daund News) विजयादशमीच्या मुहूर्तावर ही गुऱ्हाळे सुरू होतात. यावर्षी पाऊसच नसल्याने खंड न पडता गुऱ्हाळे चालू आहेत. पाण्याअभावी शेतकरी आहे या परस्थितीमध्ये आपल्या उसाची तोडणी करत आहे.
पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाई सांभाळण्यासाठी चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ गो शाळेला दिल्याची माहिती गो शाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी दिली. (Daund News) यापूर्वी भटक्या गायी गो शाळेत दाखल केल्या जायच्या. या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाई गो शाळेत दाखल होत असल्याने दुष्काळाचे विदारक चित्र ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.
पाण्याअभावी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने, दूध उत्पादन देखील घटले आहे. यामुळे शेतकरी व दूध संस्थांना मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. (Daund News) गणराया भक्तांची हाक नक्की ऐकेल. आनंदघन बरसेल अन् शेतकऱ्यांचे समाधान करेल, अशी अपेक्षा आहे, असे मत जय मल्हार दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष गणपत लव्हटे यांनी व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : देलवडी सेवा सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय