संदीप टूले
Daund News : केडगाव : राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, व येत्या पंधरा ते वीस दिवसात ठोस निर्णय घ्या, नाहीतर धनगर समाज बांधवांना एसटीचे प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा राज्यातील धनगर समाज राज्यातील प्रस्तापित राजकारणांचे राजकीय चित्र बदलून टाकेल. असा थेट इशारा धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनशाम हाके यांनी सरकारला दिला.
धनगर समाज राज्यातील प्रस्तापित राजकारणांचे राजकीय चित्र बदलून टाकेल
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.२१) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर तब्बल दिड ते दोन तास महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहने अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. (Daund News) पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक ते पाटस टोल नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पाटस टोलनाक्यावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी बोलताना घनश्याम हाके म्हणाले, सन २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले? १० वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर होते आणि आता ९ वर्षे भाजप सत्तेवर आहे.या दोन्ही सरकारने धनगर समाजाची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. त्यामुळे या चोरांवर विश्वास ठेवावा कसा ? यांना धनगर समाजाची मते चालतात मात्र धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही. मात्र, पुढील १५ ते २० दिवसांच्या आत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. तसे न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाज सरकारला त्यांची जागा दाखवून देईल आणि त्याची सुरुवात दौंड आणि बारामती मतदार संघातून होईल. असे हाके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उभे राहील. हे लक्षात घ्या, दौंडच्या आमदारांनी या आंदोलनाच्या ठिकाणी येणे अपेक्षित होते. (Daund News) दौंड तालुक्यात धनगर समाज ७० हजार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत दौंडच्या आमदारांची बत्ती गुल होऊ शकते. धनगर समाजाला एवढ्या हलक्यात घेऊ नका. असाही इशारा घनःश्याम हाके यांनी बोलताना दिला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, धनगर समाजाचे नेते रामकृष्ण बिडगर ,राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कोऱ्हाडे यांची भाषणे झाली. (Daund News) या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष चेतना पिंगळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख सतीश तागड, संतोष टेळे, सुभाष कोळपे, गोकुळ पिंगळे यांच्यासह दौंड, बारामती, हवेली, शिरूर तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तापू लागले दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण