संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील मिनी शहर म्हणून ज्याची तालुक्यात ओळख आहे, अशा केडगावातील केडगाव-हंडाळवाडी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात असून, याकडे केडगाव ग्रामपंचायत लक्ष देणार का? अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती
केडगाव भागातील रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. (Daund News) त्यात केडगावसह परिसरात शुक्रवारी (दि.२२) संध्याकाळी प्रथमच अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्याने संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करत असतानाही डागडुजीकडे दुर्लक्ष करत आहे.
लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात आश्वासने देतात. त्यानंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. (Daund News) हा रस्ता दोन-तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधित केडगाव ग्रामपंचायतने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, अशा शब्दांत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वाहनचालक, शेतकरी, पादचारी यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. केडगाव- हंडाळवाडी रस्ता हा केडगाव बाजार पेठला जोडणारा मुख्य रस्ता असून, या रस्त्यावर नेहमीच या भागातील व्यावसायिक, शेतकरी, दुध वाहतूक करणारे गवळ्याचा मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे.
या परिसरातील शेळकेमळा, खुटबाव, गलांडवाडी, एकेरीवाडी, देलवडी पिंपळगाव या गावांना केडगावला जोडण्यासाठी जवळचा एकमेव मार्ग असल्यामुळे कायमच वर्दळ असते.(Daund News) तरी संंबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादुरुस्त होत असून, वाहन चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा; ग्रामपंचायत सदस्याची मागणी
या रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्ड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघताच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी ग्रामपंचायतने त्वरित याची दखल घेवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा.
– दिलीप हंडाळ, ग्रामपंचायत सदस्य