पुणे : पुण्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता घरामध्ये एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावसभावाने चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना सप्टेंबर २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १७ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा आहे. पिडीत मुलीला घरी ठेवून फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी मावस भावाने मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिचे जबरदस्तीने कपडे काढले. तसेच तिच्या तोंडाला रुमाल बांधून चाकूने मारून टाकण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केला.
त्यानंतर कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत मुलीने कोणाकडेही वाच्यता केली नव्हती. मात्र, याबाबत तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.