पुणे / राहुलकुमार अवचट : पुरंदर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव या विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील ३२,३६६ मतदारांची बोगस नोंदणी ही पुरंदर हवेली मतदारसंघात करण्यात आली आहे. २०१९ साली पुरंदर हवेली मतदारसंघातून विश्वजित कदम यांचे मेहुणे संजय जगताप हे भ्रष्ट पध्दतीने निवडून आले आहेत, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
तसेच ३२२६६ बोगस मतदार हे पुरंदर हवेलीतील शहरी भागात नोंदवले गेले जसे की आंबेगाव खुर्द,आंबेगाव बुद्रुक, भेकराई नगर, फुरसुंगी, देवाची उरुळी, नीरा शहर, सासवड शहर आणि जेजुरी शहर या सर्व भागात बोगस मतदार नोंदणी केली गेली. याबाबत निवडणूक आयोगाकडे सर्व पुरावे सादर केले असून, ही नावे मतदार यादीतून वगळावी ही मागणी केल्याचे यावेळी सांगितले. यासोबतच ज्यांची नावे दोन वेळा आहेत, अशा बोगस मतदारांवर व ज्यांनी ही नावे नोंदवून घेतली अशा तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशीही मागणी केली.
यासाठी सतत पाठपुरावा देखील सुरू राहणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. ही फक्त निवडणूक आयोगाची फसवणूक नसून पुरंदर-हवेली तालुक्यातील तमाम नागरिकांची फसवणूक आहे. जनता येणाऱ्या निवडणुकीत यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.