लोणी काळभोर (पुणे): पुण्याच्या पुर्व भागात सर्वात संवेदनशील पोलिस स्टेशन असा लौकिक असणाऱ्या लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षत दत्तात्रेय चव्हाण छत्तीस वर्षाच्या पोलिस खात्यातील सेवेनंतर मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा पदभार वरीष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी नुकताच स्विकारला आहे.
दशरथ पाटील यांच्या समोर स्थानिक स्वयंमघोषित राजकीय नेते व पत्रकार यांचा पोलिस ठाण्यातील वावर कमी करणे, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्था कायम राखणे यासह गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस ठाण्याच्या नवीन जागेसाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींचे मोठे आव्हान असणार आहे. सोबतच सायबर क्राईम, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फळकुट किरकोळ दुकानदारांकडून खंडणी वसुली यासह स्ट्रीट क्राईमकडेही पाटील यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
दरम्यान, मागील पंधरा वर्षाच्या काळात सिंघम पोलीस आधिकारी म्हणून नावलौकिक कमावलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्या नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बरेच आधिकारी आले व गेले. परंतु, आपल्या कामाच्या पद्धतीचा न मिटणारा ठसा जो सुहास गरुड यांनी उमटवला, तसा ठसा उमटवण्याची कामगिरी करणे नंतरच्या दहा वर्षांतील एकाही आधिकार्याला जमले नाही. नुकतेच, सेवानिवृत्त झालेले दत्तात्रेय चव्हाण यांच्या काळात नको त्या व्यक्तींचा वावर पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता. नुतन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील आपल्या कामगिरीने सुहास गरुड यांच्या “सिंघम पाॅलीसी” ची परंपरा पुढे चालवणार की दत्तात्रेय चव्हाण यांच्या काळातील चमको नेते व स्थानिक स्वयंम घोषित राजकीय नेते यांच्या समवेतच्या मळलेल्या पायवाटेवरुनच चालणे पसंत करणार, याकडे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिकांचे लक्ष असणार आहे.
हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड २०१० – २०१३ या कालावधीत “सज्जनांचा पुरस्कार, दूर्जनांवर कायदेशीर वार” ही त्यांच्या कामकाजाची पद्धत होती. कामाच्या या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यांची ती लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांची २०१३ मध्ये बदली झाल्यानंतर येथे आलेल्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाच्या कामगिरीची तुलना सुहास गरुड यांच्या कामगिरीशी केली जाते. सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या या तुलनेत नंतर आलेला प्रत्येक आधिकारी अनुत्तीर्ण झाला आहे. नव्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या कारभाराची तुलना ही सर्वसामान्य नागरिक सुहास गरुड यांच्या कारभाराशी करणार हे अपरिहार्य आहे.
लोणी काळभोर व त्या लगतच्या गावात नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजार भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही. महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शाॅपींग माॅलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डिजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. हे असे वागणे म्हणजेच जीवन आहे किंवा या शिवाय जीवन असूच शकत नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने तरुणांचे आयुष्य खराब होत आहे. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला नवीन पोलीस निरीक्षकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परीसरात मागील काही दिवसांपासून लग्नाच्या वरातीत तलवारी हातात घेऊन नाचणे, तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे, कापलेला केक न खाता एकमेकांच्या तोंडाला लावणे, वाढदिवस साजरा करताना अंडी एकमेकांच्या अंगावर फोडणे असले विचित्र प्रकार बहुतेक सर्वच ठिकाणी सुरू आहेत. एंकदरीत पहाता लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी एका खंबीर, खमक्या बाजीराव सिंघमची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील बेभान झालेल्या तरुणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे भवितव्य गंभीर आहे.
वाढदिवस अधिकाऱ्याचा की भावी नेत्याचा…
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण नुकतेच सेवानिवृत्त झाले. पण त्यांनी सेवानिवृत्तीच्या अगोदर साजरा केलेला वाढदिवस व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पोलिस खात्याच्या कार्यपध्दतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन गेला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवस व सेवानिवृत्तीचे एखाद्या नेत्याप्रमाने लागलेले फ्लेक्स पोलिसांची प्रतिमा मलीन करुन गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. राजकीय नेत्याप्रमाणे, अनेकांनी आयजीच्या जिवावर बायजी होत स्वतःला मिरवुन घेतल्याची चर्चा पोलिस दल व सर्वसामान्य जनतेत सुरु आहे. अधिकारी स्वतःच्या जाहिरातीत गुंतल्याने, त्यांच्या हाताखालील पोलिसांनी लोणी काळभोरमध्ये मागील दोन ते अडीच महिन्यांच्या काळात मोठा धुडगुस घातल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे पोलिसांनी मलीन झालेली प्रतिमाही सावरण्याचे काम दशरथ पाटील यांना करावे लागणार आहे.