उरुळी कांचन, (पुणे) : बांधाच्या शेजारून दुथडी भरून कालवा वाहत आहे. मात्र विजेअभावी हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. हे चित्र आहे पूर्व हवेलीतील काही शेतांमधले. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे टिळेकरवाडी, व परिसरातील परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.
विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने कडक उन्हामुळे शेतातील पिके सुकू लागली आहे. त्यामुळे योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दोन आठवड्यांपासून 40 वर पोहोचलेला पारा, उन्हाच्या दाहकतेने भेगाळणाऱ्या जमिनी, महावितरणचा आठ तास वीजपुरवठा मात्र त्यातही 2 ते 3 तासाचे लोडशेडिंग यामुळे पुरेशी जमीन भिजत नसल्याने करपत चाललेली पिके ही भयाण वास्तवता सध्या शिवारात आहे. वाढत्या उन्हासह महावितरणच्या दुजाभावामुळे नदीकाठच्या गावांतील पिके, जनावरे व शेतकरी होरपळून निघत आहेत.
शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरुस्त होत आहेत. वीज वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे. कुठलीही सकारात्मक कार्यवाही याबाबत केली जात नाही. दिवसा फक्त सहा ते साडेतास वीज शेतीपंपांना मिळत असून सर्वच भागांत शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वैतागले असून विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे पिके करपू लागली आहेत. भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर दुरुस्तीच्या संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असून, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. सतत
रोहित्रे नादुरुस्त:
वीजपुरवठा यंत्रणेत अनेक रोहित्रे नादुरुस्त, तर काही कायमस्वरूपी बंद असल्याचे आढळले. वीजतारांची अवस्थाही भीषण आहे. बऱ्याच जागी या तारा लोंबकळल्या असून, काही ठिकाणी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र त्यांच्या दुरुस्तीची तसदी वीज कंपनी घेत नाही. परिणामी अनेकदा तक्रार करूनही वीजपुरवठ्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. वीज कंपनीचे कर्मचारी, अधिकारी तांत्रिक काम हाती घेऊन वीजपुरवठा बंद करतात. असा आरोपहि काही शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे म्हणाले , “कालव्याला पाणी आल्याने वळती फिडरवर लोड येत आहे. वळती फिडरवरील टॅप ओपन करीत आहोत. लोड शेडींग करण्यात आलेले नाही.”
याबाबत बोलताना शिंदवणे येथील शेतकरी गुरुनाथ मचाले म्हणाले, “बांधाच्या शेजारून दुथडी भरून कालवा वाहत आहे. मात्र पाणी असून विजेअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दिवसाचे एक एकरहि जम्नीन भिजवता येत नाही. बऱ्याच जागी विजेच्या तारा लोंबकळल्या असून तारा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे.”
याबाबत बोलताना सोरतापवाडी येथील नर्सरी व्यावसायिक अशोक चौधरी म्हणाले, “सध्या ऊन वाढल्याने नर्सरीतील झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. विजेचा वारंवार खेळखंडोबा होत असल्याने पाणी असूनही देता येत नाही. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.”