पुणे : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सराईत गुंडांनी कायदा सुव्यवस्था धुळीस मिळवीत थेट पुणे पोलिसांसमोर आव्हान उभे केले. भाजप उमेदवार विजयी झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तडीपार गुंडांनी पोलीस ठाण्या समोरच धांगडधिंगा घातला. मै हु डॉन या गाण्यावर ठेका धरत सहकारनगर पोलिसांना चॅलेंज केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, अद्यापही संबंधितांविरुद्ध पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
गणेश काथवडे, ऋषी शिंदे, अमीत ढावरे अशी नाचलेल्या सराईत आरोपींची नाव आहेत. संबंधित आरोपी मोक्कामधील असून, सध्या जामिनावर आहेत. आरोपींवर तडीपार कारवाई केली होती. मात्र, तरीही कायद्याची भीडभाड न ठेवता आरोपींनी विजयोत्सव केल्याचे दिसून आले आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. त्यानंतर विविध भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात डीजे वादन करून आनंद उत्सव साजरा केला. त्या आनंदात सहभागी होण्यासाठी चक्क तिन्ही सराईत गुंडांनी सहभाग घेतला होता. या तिघांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तडीपार कालावधीतही शहरात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपींनी पोलिसांना न जुमानता विजय मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर डीजे लावून नाचताना दिसून आले आहे.