शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे घरात शिरलेल्या चोरट्यांनी शेतकरी नागवडे कुटुंबातील पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करत सोन्याचा ऐवज तसेच रोकड असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. न्हावरे (ता.शिरूर) येथील नागवडे वस्तीवर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्यावर केडगाव (दौंड) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परशुराम बाबूराव नागवडे (वय 55) त्यांची पत्नी लीलाबाई परशुराम नागवडे (वय 50, दोघे रा. नागवडे वस्ती, न्हावरे, ता. शिरुर) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी लीलाबाई नागवडे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तीन चोरट्यांनी नागवडे यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर लिलाबाई यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. त्यावेळी परशुराम यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कुर्हाडीचा उलटा घाव घातला. त्यानंतर कपाटातील रोख 20 हजार रूपये व लिलाबाई यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने तसेच नंणद भामाबाई कांडगे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. तसेच लिलाबाई यांना लोखंडी गजाने मारहाण केली.
दरम्यान, दुसर्या खोलीत नागवडे यांचा मुलगा होता. आवाजाने तो जागा झाला. परंतु चोरट्यांनी त्या खोलीला बाहेरून कडी लावली. त्याने आरडाओरड केल्याने मुद्देमाल घेऊन चोरटे घराशेजारील ऊसाच्या शेतात पसार झाले.
न्हावरे पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाटील
करत आहेत.