पुणे : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशातील शंकराचार्यांचा अपमान केल्यामुळे त्यांच्याविरोधात पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये कॉंग्रेस पार्टीतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनावेळी पुण्यातील कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जिवंत कोंबडी आणली होती. ही कोंबडी लक्षवेधी ठरत होती.
काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनस्थळी आणलेल्या जिवंत कोंबडीबद्दल बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, नारायण राणे यांनी शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. नारायण राणे व त्यांच्या मुलांनी राजकारणाचा स्तर खाली आणण्याचे काम केले आहे. भाजपाने त्यांना भुंकण्यासाठी ठेवले आहे. मोदी हे शंकराचार्यांपेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्ह आहे.
मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याचे शंकराचार्य यांनी म्हटले असून, त्यावरून जोरदार टीका-टिपण्णी सुरू आहे. त्यांनी उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. यावरुन राजकीय वादंग निर्माण झाले असतानाच भाजप नेते नारायण राणे यांनी शंकराचार्यानी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? असा सवाल केला.
दरम्यान, नारायण राणे यांनी शंकराचार्य यांना त्यांचे योगदान विचारल्यामुळे राणेंवर जोरदार टीका होत आहे.